Nagpur Municipal Corporation Election Congress NCP SP Controversy:
नागपूर: काँग्रेसने भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडी तोडली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ७९ उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. आज या सर्वांना पक्षाने एबी फॉर्म दिले. यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी होती.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि राष्ट्रवादी शप गटाचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या स्वाक्षरीसह 15 जागा देण्याचा निर्णय झाल्याचे पत्र दाखवित नियोजनबद्ध पद्धतीने जाणीवपूर्वक काँग्रेसने आघाडी तोडली असे अनिल देशमुख यांनी आरोप केले.
आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्यात परस्पर संमतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. मात्र, शेवटच्या दिवशी काँग्रेस नेत्यांनी फोन घेतले नाही. पुण्यातही हेच झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला (एस.पी.) सोडलेल्या जागांवर कोणतीही पूर्वसूचना न देता काँग्रेसने स्वतःच्या उमेदवारांना 'बी फॉर्म' दिले असाही आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
आघाडीचा करार झाल्यानंतर काँग्रेसने केवळ भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी रात्री ३ वाजता महाविकास आघाडी तोडली. भाजपला फायदा पोहचविण्यासाठी काँग्रेसचे स्लीपर सेल काम करीत असून याचा फटका गेल्यावेळी 23 प्रभागात बसला. यावेळीही तो बसेल आणि भाजपला फायदा पोहचेल असा आरोप प्रदेश प्रवक्ते जिल्हा अध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी केला. एकंदरीत दोन्हीकडे स्वतंत्र लढल्यामुळे नागपुरातील अनेक प्रभागातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.