Abhijit Dipke Nagpur protest
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अभिजित दीपके यांचे आज (ता. १६) सायंकाळी ४ वाजता येथील संविधान चौक येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी जयपूरमधील आंदोलनादरम्यान त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नागपुरातील समर्थक अधिक सतर्क झाले आहेत. दरम्यान, दिपके यांना नागपूर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावली आहे. नागपुरात प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच आंदोलन शांततेत पार पडावे, यासाठी आवश्यक सूचनांचा समावेश या नोटिशीत करण्यात आला आहे. संविधान चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
जयपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर नागपुरात पोहोचलेले अभिजित दिपके यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावली आहे. ही नियमित स्वरूपाची नोटीस असून आंदोलन किंवा मोर्चा आयोजित करणाऱ्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून दिली जाते.नोटिशीत आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलनात वापरण्यात येणारे फलक, बॅनर, घोषणाबाजी किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून नागरिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी आंदोलन शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पार पडावे, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही यासाठी आयोजकांनी आवश्यक सहकार्य करावे, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात नागपूरचे पोलीस उपायुक्त एस. रेड्डी यांनी प्रतिक्रिया देताना ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. आंदोलन किंवा सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या नोटिसा संबंधित आयोजकांना देण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, जयपूरमधील हल्ल्यानंतर अभिजित दिपके यांच्या नागपूर दौऱ्याकडे आणि त्यांच्या आंदोलनाकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले असून, पोलीस प्रशासनानेही सुरक्षेत वाढ करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
काक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके हे आज (दि. १६) सकाळी नागपुरात पोहोचले. या वेळी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जयपूर येथे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देत, हा हल्ला त्यांना घाबरवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला. कोणत्याही दबावाला बळी न पडता आंदोलन लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना अभिजित दिपके यांनी, जयपूर येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. "जे काही घडले ते आम्हाला घाबरवण्यासाठी आणि आमच्या आंदोलनाच्या मुख्य मुद्द्यांपासून भटकवण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र अशा हल्ल्यांमुळे आम्ही आमच्या भूमिकेपासून माघार घेणार नाही," असे ते म्हणाले.दिपके यांनी स्पष्ट केले की, "तुम्ही आमच्यावर कितीही हल्ले करा, कितीही हात उचला; आम्ही आमचा हात उचलणार नाही. आम्ही लोकशाही आणि संविधानिक मार्गानेच आमचे आंदोलन पुढे नेऊ. आमचा संघर्ष हा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे आणि तो सुरूच राहील." विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना दिपके म्हणाले, "नीटचे सुमारे २२ लाख विद्यार्थी, सीबीएसईचे १७ लाख विद्यार्थी, सीयूईटीचे १६ लाख विद्यार्थी तसेच एसएससी जीडीसह विविध परीक्षांतील जवळपास ४० लाख विद्यार्थी अशा एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
अभिजित दीपके यांच्यावर जयपूर येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. आज संविधान चौकात होणाऱ्या नीट पेपरफूट आणि बेरोजगारीविरोधातील आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. अभिजित दीपके यांचे आज मंगळवारी (ता. १६) सायंकाळी ४ वाजता संविधान चौक येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. जयपूरमधील आंदोलनादरम्यान त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नागपुरातील समर्थक अधिक सतर्क झाले असून दीपके यांच्या सुरक्षेबाबत विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे समर्थकांनी सांगितले.
दीपके यांनी नागपुरातून सरकारला थेट आव्हान देण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात तीन हजारांहून अधिक आंदोलनकर्ते सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनानेही आवश्यक खबरदारी घेतली आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर दीपके यांनी पुणे, लखनौ, अमृतसर, बंगळुरू आणि जयपूर येथे आंदोलने केली होती. जयपूरमधील घटनेनंतर आता त्यांचे पुढील आंदोलन नागपुरात होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अभिजित दीपके आणि आंदोलनस्थळी उपस्थित नागरिकांच्या सुरक्षेसाठी १५ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ-२च्या पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांनी दिली. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. आंदोलनस्थळावर ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार असून जयपूरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दीपके यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.