नागपूर

Nagpur Ganeshotsav: नागपुरातील हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची अनोखी परंपरा

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा:  देशभरात भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा केला जातो. नुकतीच या गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. मात्र, नागपुरातील गणेशोत्सव अद्याप संपलेला नाही. नागपूरकर भोसले घराण्याच्या वतीने नागपुरातील महाल भागात असलेल्या मोठा राजवाडा येथे दरवर्षी पितृपक्षात हाडपक्या गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. (Nagpur Ganeshotsav)

गेल्या 236 वर्षांपासून ही अनोखी परंपरा कायम आहे. पूर्व विदर्भातील लोक या पितृपक्षातील गणेश उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. नागपूरकर भोसले घराण्यातील लढवय्ये सरदार श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू हे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बंगालच्या स्वारीवर गेले होते. तेथे विजय प्राप्त करून परत येत असताना कुळाचाराच्या घरगुती गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे बंगालवरील विजयोत्सव साजरा करण्यासाठी पितृपक्षात इ.स. 1787 मध्ये चिमणाबापू यांनी हाडपक्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या उत्सवाची परंपरा सुरू झाली. नागपुरातील भोसले घराण्यात दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. (Nagpur Ganeshotsav)

भोसले राजवाड्यातील हाडपक्या गणपतीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचे वेगळेपण म्हणजे भोसले घराण्यात चिमणाबापूंनी 16 हातांची, 21 फुटाची मूर्ती स्थापन केली होती. अनेक वर्षे याच प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. परंतु 2005 पासून मूर्तीची उंची कमी करण्यात आली. आता चार फुटांची मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येते, परंतु गणेश मूर्ती चे 16 हातात आयुध्य आता ही तसेच ठेवण्यात आले आहे. संकष्टी चतुर्थीला त्याची प्रतिष्ठापना केली जाते आणि 10 दिवसांनी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. दरवर्षी भोसले वाड्यात हा उत्सव अविरतपणे साजरा केला जातो.

मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यापासून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पूर्वापार अनेक लोककला सादर करण्यात येतात. प्रामुख्याने लावणी, नकला, खडी गंमत इत्यादी अनेक थट्टा- मस्करीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत. या कार्यक्रमांना नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत. यामागील मुख्य धारणा अशी की, या लोककलेला राजाश्रय देऊन ही लोककला जपली जावी आणि समाजात एकता प्रस्थापित व्हावी. कालांतराने या थट्टा-मस्करीच्या कार्यक्रमाहून या गणेशोत्सवाला स्थानिक बोलीभाषेतील 'मस्कऱ्या गणपती' म्हणून देखील नाव प्रचलित झाले, अशी माहिती राजे मुधोजी भोसले यांनी दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT