बारा वर्षीय मुलीच्या गर्भपाताच्या याचिकेवर सुनावणी  
नागपूर

Highcourt Nagpur Bench | बारा वर्षीय मुलीच्या गर्भपाताच्या याचिकेवर सुनावणी

हायकोर्टाचे अकोला मेडिकल बोर्डाला तत्काळ तपासणीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एका अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. ही याचिका बारा वर्षीय मुलीच्या पालकांनी अ‍ॅड. सोनिया गजभिये यांच्यामार्फत दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि सचिन देशमुख यांनी पीडित मुलीची मंगळवारी, १७ जून रोजी मेडिकल बोर्ड स्थापन करून पीडितेचा तपासणी अहवाल मंगळवारी हायकोर्टात सादर करावा, असे आदेश मेडिकल बोर्डाला दिले.

याचिकेनुसार पीडित मुलगीवर ५ जून २०२५ रोजी लैंगिक शोषणाचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ६४(२)(१), ६४(२)(एम), ६५(२), ३५१(२) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२ च्या कलम ४ आणि ६ अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडितेची जन्मतारीख ५ जानेवारी २०१३ असून ती २८ आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांची गर्भवती आहे. यासंदर्भात अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना एक वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे मंडळ पीडित मुलीच्या आरोग्याची तपासणी करेल आणि गर्भपात व गर्भवती संपुष्टात आणण्यासाठी ती वैद्यकीयदृष्ट्या योग्य आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, याबाबत आपले मत देईल. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून अल्पवयीन मुलीच्या आरोग्याशी आणि तिच्या भविष्याशी संबंधित आहे. न्यायालयाचा पुढील निर्णय वैद्यकीय मंडळाच्या अहवालावर अवलंबून असेल. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

हायकोर्टाने पीडितेची वैद्यकीय तपासणी करून ती गर्भधारणा समाप्तीसाठी पात्र आहे का, हे तपासण्यासाठी अकोला मेडिलकच्या अधिष्ठात्यांना वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले. पीडितेला मंगळवारी, १७ जून रोजी सकाळी १० वाजता अकोला मेडिकलमध्ये अधिष्ठात्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पीडिता ही कथित गुन्ह्याची बळी असल्याचे दिसून येते. पीडितेने आपल्या आई-वडिलांमार्फत न्यायालयात धाव घेतली आहे. पीडित याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सोनिया गजभिये, तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. एच.डी. मराठे यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT