विदर्भ

नागपूर : गायक गिरीश वझलवार यांचे मुंबईत निधन

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मेवाती घराण्यातील श्रेष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे नागपूरकर शिष्य पंडित गिरीश वझलवार यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे शुक्रवारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लहानपणापासून गाण्याची आवड असल्यामुळे गिरीश यांनी भातखंडे गायन समाजाचे गायक प्रभाकरराव खर्डेनवीस गाणे शिकायला सुरवात केली. पं. जसराज यांचे गाणे खूप आवडत असल्याने त्यांच्याकडे गाणे शिकण्याची गिरीश यांची मनापासून फार इच्छा होती. एका मैफिलीसाठी पंडितजी नागपूरला आले असता त्यांना गिरीश यांचे गाणे ऐकण्याचा योग आला. पंडितजींना गाणे आवडल्याचे बघून गिरीश यांनी त्यांच्याकडे गाणे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला पंडितजींनी त्याला लगेच होकार दिला आणि पुढे ते जसराजींचे पट्टशिष्य झाले.

पंडिजींकडे गाणे शिकल्यानंतर ते त्यांना मैफिलीत तानपुऱ्यावर साथ द्यायला लागले. याशिवाय शास्त्रीय गायनाच्या त्यांच्याही स्वतंत्रपणे मैफिली होत. नागपुरातील एका मैफिलीत पंडितजींना गिरीश आणि पं. संजीव अभ्यंकर या दोन शिष्योत्तमांनी साथ दिल्याचे रसिकांना आठवते. गिरीश यांच्या शास्त्रीय गायनाच्या अनेक ध्वनिफिती निघाल्या असून त्यांनी हिंदी व मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. गायना व्यतिरिक्त क्रिकेटमध्ये त्यांची रुची होती. खट्याळ स्वभाव आणि तल्लख विनोदबुद्धीमुळे ते मित्रांना विशेष प्रिय होते. त्यांच्या निधनामुळे नागपूरच्या संगीत अवकाशातील एक प्रकाशमान तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT