गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: तेलंगणा सरकारने तेलंगणा-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीनधारक शेतकऱ्यांनी सिरोंचा येथे साखळी उपोषण आरंभिले आहे. उपोषणाला महिना होऊनही प्रशासनाने लक्ष न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तेलंगणा सरकारने कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीवर मेडिगड्डा धरण बांधले. या धरणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील ३७३.८० हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्यापैकी १३८.९१ हेक्टर जमिनीची भूसंपादन प्रक्रिया अजूनही रखडली आहे. या जमिनीचे भूसंपादन करताना आम्हाला सध्याच्या बाजारभावानुसार मोबदला मिळावा, अशी जमीनधारक शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याअनुषंगाने पीडित शेतकऱ्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान उपोषण केले होते. त्याचे पडसादही विधिमंडळात उमटले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबंधित शेतकऱ्यांना राज्य सरकार मोबदला देईल आणि सोबतच बॅक वॉटरमुळे बुडीत असलेली जमीनदेखील सरकार विकत घेईल, असे आश्वासन दिले होते.
परंतु, घोषणा करुन पाच महिने उलटले तरी मोबदला न मिळाल्याने पीडित शेतकऱ्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या उपोषणाला ३५ दिवस उलटले असून, प्रशासनातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने उपोषणाची दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा