

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : बायकोकडे कपडे शिवण्यासाठी घरी येणाऱ्या महिला कपडे बदलत असतानाचे चित्रीकरण करणाऱ्या एका गुरुजीस देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. नंदकिशोर भाऊराव धोटे (४५ ,रा.देसाईगंज) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो कुरखेडा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे.
हकीकत अशी की,नंदकिशोर धोटेची पत्नी घरी महिलांचे कपडे शिवण्याचे काम करते. त्यासाठी दररोज अनेक महिला धोटेच्या घरी येत असतात. शिवलेले कपडे फिट आहेत की नाही, हे बघण्यासाठी धोटेच्या घरी एक छोटीसी खोली आहे. या खोलीत महिला कपडे बदलून पाहायच्या. हीच संधी साधून धोटे गुरुजी एका छिद्रातून आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करायचा. ही बाब एका महिलेच्या लक्षात आली. तीने देसाईगंज पोलिसांत तक्रार करताच पोलिसांनी धोटे गुरुजीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. आज कुरखेडा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. धोटे गुरुजीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली.