

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समतीच्या निवडणुकीदरम्यान माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण झाली होती. याप्रकरणी चामोर्शीचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर खांडवे यांनी न्यायाधीशांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करून हुज्जत घातली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक खांडवे यांना निलंबित करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक झाली. त्यापैकी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल ही होती. त्याच दिवशीच्या पहाटे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी पोलीस ठाण्यात बोलावून निवडणुकीतील एका उमेदवारास आणि माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात गण्यारपवार यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्याय दंडधिकारी एन. डी. मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२६, अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश २० मे रोजी दिले. या आदेशानंतर संतप्त झालेले पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी आज सकाळी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करीत हुज्जत घातली. याप्रकरणी न्यायाधीशांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांना अवगत केल्यानंतर गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण चामोर्शी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. त्यावरुन पोलिसांनी राजेश खांडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर राजेश खांडवे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.