नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथे १६ एप्रिल रोजी होणारी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सभा ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणीच होईल यात तसुभरही बदल होणार नाही असा इशारा माजी मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. मात्र भाजपने पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी येथील या मैदानाचा उपयोग क्रीडांगण म्हणून होत असल्याने जाहीर सभेला विरोध दर्शविला आहे.
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात रविवारी (दि. ९) सकाळी या संदर्भात आंदोलन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज नागपुरात मविआच्या या सभेची पूर्वतयारी आढावा बैठक झाली. या निमित्ताने बोलत असताना माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी परवानगी मिळल्यानुसार मविआची सभा होणारच आणि भव्य होईल असे ठणकावले. दरम्यान, भाजपच्या विरोधाला स्थानिक नागरिकांनी देखील साथ दिली आहे. नुकतेच एनआयटीने १.५ कोटी खर्चून मैदान चांगले केले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पार्किंगसाठी जागा नाही. सभेला शहरातील इतर मैदानांचा पर्याय आहे, अशी मागणी या लोकांनी रेटली आहे. एकंदरीतच मविआच्या सभेला अडचणी कायम आहेत.
हेही वाचा