चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकिट द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मी पदासाठी काम करत नाही. मुख्यमंत्री पदासाठी आपण इच्छुक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपूर जिल्हयाच्या दौऱ्यावर त्या बाोलत हाेत्या.
सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत. तत्पूर्वी सुळे यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आ. जोरगेवार यांच्या मातोश्रींची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी राबविलेल्या विविध कल्पक योजनांची माहितीही सुळे यांनी करून घेतली.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या भेटीनंतर सुळे यांनी समाधान व्यक्त केले. कर्तृत्ववान महिलेच्या पोटी आलेल्या कर्तृत्ववान मुलाचे काम पाहताना अभिमान वाटल्याचं त्यांनी म्हटलं. या कौटुंबिक भेटीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी जोरगेवार यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या राजकारणात काही गोष्टी 'दिलसे' कराव्या लागतात, असेही यावेळी त्या म्हणाल्या. राज्यसभा निवडणुकीत मविआ बॅकफूटवर असल्याची स्थिती असताना खा. सुळे यांनी आ. जोरगेवार यांच्यासाठी कुठला संदेश आणलाय, याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.
हेही वाचा :