विदर्भ

Chandrapur Rain : चंद्रपूर शहराला मुसळधार पावसाने झोडपले; नागरिकांची तारांबळ

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरात दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील नागरिकांची चांगलीच दाणादाण झाली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कुठे गुडघाभर तर कुठे कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांना मार्गक्रमण करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शहरातील अनेक वार्डात व घरांमध्ये पाणी घुसले. सकाळी शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत येताना शाळेत अडकून राहावे लागले. महापालिकेची शहरातील सांडपाणी वितरण व्यवस्था कुचकामी ठरल्याने सर्वसामान्य नागरिकांना आजच्या पावसाचा फटका (Chandrapur Rain) बसला.

चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागासह चंद्रपूर शहरात पहाटेपासून पावसाला (Chandrapur Rain) सुरुवात झाली. दोन ते तीन तासानंतर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शहरातील मुले- मुली शाळेकडे रवाना झाली. तर नागरिक घराबाहेर निघाली. त्यानंतर पुन्हा साडेआठच्या सुमारास शहरात धोधो मुसळधार पाऊस बरसला. पावसाचा प्रचंड जोर जास्त असल्याने काही वेळातच शहरातील नाल्यामधून वाहणारे पाणी रस्त्यावर आले.

Chandrapur Rain : शहरातील बहुतांश भागातील रस्ते जलमय

बघता बघता शहरातील बहुतांश भागातील रस्ते जलमय झाले. दिवसभर सुमारे सात ते आठ तासांपासून शहरात पाऊस बरसल्याने शहरातील गांधी चौक, जटपुरा गेट या मार्गावर गुडघाभर पाणी जमा झाले. हाच मार्ग नव्हे तर लक्ष्मी नारायण मंदिर, लोकमान्य टिळक विद्यालय, आझाद बगीचा चौक, जयंत टॉकीज या परिसरात रस्त्यावर पाणी साचले. काही ठिकाणी तर कंबरेपर्यंत पाणी साचले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी घुसले. शंकराश्रम, चंद्रपूर वन विभाग कार्यालय तथा बगीचा जवळील दुकानांच्या चाळीत पाणी घुसले. या मार्गावरील मोठ्या नाल्याची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात आली. दरम्यान, त्या एका ठिकाणी झाकण न लावल्याने त्या खड्यामध्ये बहुतांश जण कोसळले.

विद्यार्थी शाळेत अडकले

कस्तुरबा गांधी मार्गावर स्टेट बँक ऑफ इंडिया, सिटी हायस्कूल परिसरामध्ये पाणी शिरल्याने शालेय विद्यार्थी शाळेत अडकले. डॉ. कोलते हॉस्पिटल, कस्तुरबा चौक या परिसरात देखील पाणी साचले. चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारपेठ गोल बाजार पाण्याखाली आले आहे. गंज वॉर्डातील भाजी बाजारातही पाणीच पाणी झाले. श्री टॉकीज चौक, तुकुम, वाहतूक पोलिस शाखा, हॉटेल सिद्धार्थ या परिसरातील रस्ते पाण्याखाली आल्याने वाहनधानकांची चांगलीच तारांबळ उडाली. स्कूल बस, स्कूल ऑटो शाळेत पोहचू न शकल्याने सकाळच्या सत्रातील विद्यार्थी सायंकाळी ४ वाजेपर्यंत शाळेत होते. त्यामुळे विद्यार्थी पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. जलनगर, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी, वडगाव, नगिनाबाग, रामनगर, बिनबा गेट, पठाणपुरा, नागपूर रोड, रहमत नगर, लखमापूर, अंचलेस्वर गेट परिसरातही पाणी साचल्याने घरात पाणी शिरले आहे. शेकडो घरे हजारो घरे पाण्याखाली आल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महानगर पालिकेने शहरातून जाणाऱ्या नदी नाल्यांच्या सफाईकडे दर्लक्ष केल्याने चंद्रपूर शहर जलमय झाले आहे. शहरातील रस्ते पाण्याखाली येऊन सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याच आरोप नागरिकांनी केला आहे. या व्यतिरिक्त शहरातील अनेक वार्डात पाणी साचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT