चंद्रपूर : वाघाची दहशत! ब्रम्हपुरी वनालगतच्या संवेदनशील २८ गावांना ‘रेड अलर्ट’

file photo
file photo

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत तळोधी वनपरिक्षेत्रामधील सावरगांव व उश्राळारिठ तसेच चिमुर वनपरिक्षेत्रामधील डोमा या गावातील वनालगत असलेल्या शेतामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे उत्तर ब्रम्हपुरी, दक्षिण ब्रम्हपुरी, तळोधी, चिमुर, नागभिड व सिंदेवाही या वनपरिक्षेत्रांतील २८ गावांना वन विभागाने रेड अलर्ट घोषित केले आहे. ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत उत्तर ब्रम्हपुरी, दक्षिण ब्रम्हपुरी, तळोधी, चिमुर, नागभिड व सिंदेवाही या वनपरिक्षेत्रांतील उश्राळारिठ, सावरगांव, डोमा, डोंगरगांव, बरडघाट, खडसंगी, हळदा, आवळगांव, बोळधा, कुडेसावली, किटाळी, बल्लारपूर, कोसंबी, वांद्रा, पवनपार, पदमापूर, तोरगांव, म्हसली, तीवर्ला, तुकुम, सायगाटा, मरारमेंढा, ढोरपा, कच्चेपार, सरडपार, चिटकी, नवेगांव चक, गुंजेवाही आदी २८ गावे वणालगत आहेत.

आदी वनालगतच्या गावामध्ये वनक्षेत्रात मोठया प्रमाणात वाघ या वन्यप्राण्याचा वावर आहे. सद्यःस्थितीत शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. तळोधी वनपरिक्षेत्रामधील सावरगांव व उश्राळारिठ तसेच चिमुर वनपरिक्षेत्रामधील डोमा या गावातील वनालगत नुकत्याच मनुष्यहानीच्या तीन घटना घडल्या. तिघाशेत कऱ्यांचे जीव गेले. त्यामुळे परिसरातील मनुष्यहानीच्या घटनेस कारणीभुत असणा-या वाघांची ओळख पटवून त्यांना तातडीने जेरबंद करणेबाबत वनविभागाकडून युद्ध पातळीवर कारवाई सुरू आहे. घटनेच्या परिसरात व संपूर्ण वनक्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रात वावर असणा-या वाघांची त्वरीत ओळख करणे शक्य होईल.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निष्णात असलेली चमु (शार्प शूटर व पशुवैद्यकिय अधिकारी) यांना वाघांना त्वरीत बेशुध्द करून जेरबंद करण्याकरिता तैनात करण्यात आली आहे.  परिसरातील 115 गावांमध्ये 112 प्राथमिक बचाव दलाचे 599 सदस्यांना कार्यान्वीत करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी वनविभागातील सर्व परिक्षेत्रातील कर्मचारी वर्गास अतिसतर्केचा इशारा देण्यात आला आहे.  दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कुटुंबियांना तातडीची मदत तसेच शासन धोरणानुसार प्रत्येकी 20 लक्ष सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे. वाघांचे हालचालींवर सनियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन द्वारे निगराणी करण्यात येत आहे. तरी सदर वनालगतचे गावातील सर्व नागरिक, विशेषतः शेतकरी व गुराखी यांना एकटयाने वनक्षेत्रात वा वनक्षेत्रालगतचे शेत शिवारात न जाणेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वनालगत व वनक्षेत्रात शेती असलेल्या शेतक-यांनी शेतात जाताना एकटयाने न जाता समुहाने जावे तसेच वनविभागाचे कर्मचारी, प्राथमिक बचाव दलाची चमू यांना सुचित करून जावे.

गुराख्यांनी दाट वनक्षेत्रात गुरे चराई करिता घेऊन जाऊ नये व वनक्षेत्रात जनावरांसोबत एकटे राहू नये, शेतक-यांनी रात्रीचे वेळी शेतात जाणे टाळावे, नैसर्गिक विधीकरिता वनक्षेत्रात जाऊ नये. शौचालयाचा वापर करावा, गावालगत अनावश्यक वाढलेली झाडे झुडुपे साफ करावी, सरपंच ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांनी गावाचे लगतचे रस्त्यावर प्रखर विद्युत दिवे लावण्याची व्यवस्था करावी. गावाजवळ वा शेतात वाघ वा ईतर हिंस्र वन्यप्राणी दिसल्यास त्याबाबतची माहिती लगेच वनविभागाला द्यावी. वन्य प्राण्यांना बघण्यासाठी गर्दी न करणे, दगड मारून पळवून लावण्याचा प्रयत्न न करणे, त्याचे मोबाईलने छायाचित्र काढण्याचा प्रयत्न न करणे, पहाटे व सायंकाळी अंधारामध्ये गावाबाहेर / शेतात जाण्याचे टाळणे, ज्या भागात वाघीण पिल्लांसह दिसत असेल त्या भागात जाणे टाळण्याचेही आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news