नागपूर; पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्याची उपराजधानी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूर जिल्ह्यातील २३६ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल मंगळवारी (दि.२०) रात्री उशिरापर्यंत जाहीर झाले. भाजपच्या मते जिल्ह्यातील 236 पैकी 131 ग्रामपंचायतमध्ये त्यांचे सरपंच विजयी झाले आहेत तर काँग्रेसच्या मते त्यांचे 93 उमेदवार सरपंचपदी विराजमान झाले आहेत. तसेच भाजपचे 87 सरपंच निवडून आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ( Gram Panchayat Election )
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना पेढा, लाडू भरवित विजयाचा आनंद साजरा केला. दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी राज्यात आपलीच सरशी झाल्याचा दावा करीत आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील २३६ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाल्यानंतर मंगळवारी निकाल घोषित झाले. काँग्रेसच्या मते काँग्रेसचे ९३, भाजपचे ८७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७, आणि शिवसेनेचे १४ सरपंच विजयी झाले आहेत. तसेच निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवारांची सरपंचपदी वर्णी लागल्याचा काँग्रेसचा दावा आहे. ( Gram Panchayat Election )
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी काटोल रोडवरील फेटरी हे गाव दत्तक घेतले होते. या गावात बराच विकास झाल्याचा दावा भाजपतर्फे केला जात होता. मात्र, यावेळी तिथे काँग्रेसचा सरपंच आरूढ झालेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मूळ गाव खसाळा येथे भाजपला सत्ता राखण्यात यश मिळाले. लक्षवेधी लढतीत जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे यांचे पती विष्णू हे पिपळा डाग बंगला येथून विजयी झाले. भाजपचे ज्ञानेश्वर परतेकी यांचा तब्बल 900 मतांनी त्यांनी पराभव केला.
( Gram Panchayat Election )
कामठी मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर गटाने जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती तापेशवर वैद्य यांच्या गटाचा पराभव केला. माजी मंत्री अनिल देशमुख यांचे काटोल जलालखेडा या परिसरात वर्चस्व पुन्हा एकदा या निकालाने सिद्ध केली. ते कारागृहात असताना त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह किल्ला लढविला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात कमी २२ वर्षीय सरपंच विजयी झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.
धानला येथे भाजप समर्थित महिला उमेदवार ज्योति सावरकर विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या दाव्यानुसार हिंगणा आणि कामठी या दोन विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत वगळता अन्यत्र भाजपचा धुव्वा उडाला. उमरेड तालुक्यातील सिर्सी येथे भाजप, काँग्रेसने दावे केल्यानंतर आजी, माजी आमदारांमध्येच कोण खरे असा वाद निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, भाजप जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी आपलीच सरशी झाल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसच्या मते कामठी व हिंगणा मतदारसंघात २२ आणि १४ ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले. काँग्रेसचे अनुक्रमे १५ व ६ सरपंच निवडून आले आहेत. सावनेर तालुक्यात आमदार सुनील केदार यांनी आपले व काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले आहे. काँग्रेसचे ३७ तर भाजपचे २१ विजयी झाले. रामटेकमध्ये काँग्रेसचे २२ तर भाजपचे ८, उमरेडमध्ये काँग्रेसचे १२ तर भाजपचे ७, काटोलमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक २९, काँग्रेसचे २ तर भाजपचे १५ उमेदवार सरपंच विजयी झाले आहेत. ( Gram Panchayat Election )
शिंदे गटात गेलेले खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैस्वाल यांच्या दृष्टीने बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने रामटेक तालुक्यात सहा तर मौदा तालुक्यात एक सरपंच निवडून आणला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमरेड तालुक्यातील पिपरा ग्रामपंचायत, कलमेशवरमध्ये उबाळी, नरखेड तालुक्यातील जामगाव अशा तीन जागा जिंकल्या. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मौदा तालुक्यात निसतखेडा ग्रामपंचायतवर बच्चू कडू यांच्या प्रहारने बाजी मारली आहे.
हेही वाचा :