गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेगाडीच्या धडकेत दोन अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.18) घडली. गोंदिया - चंद्रपूर रेल्वे मार्गावरील सुकडी दाभणा परिसरातील रेल्वे बोगद्याजवळ उघडकीस आली. गोंदिया - चांदाफोर्ट रेल्वेमार्ग गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या संरक्षित वनक्षेत्रातून जात असून अनेकदा रेल्वेगाडीच्या धडकेत वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, गुरुवारी सकाळी सुकडी-दाभना गावाच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे बोगद्याजवळ दोन अस्वल मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यात रेल्वेच्या धडकेने या दोन्ही अस्वलांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी वनविभागाला दिली. अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्राचे वरिष्ठ निष्कासन अधिकारी एस. डी. अवगान, वन परिक्षेत्र अधिकारी एच. डी. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ भेट देवून पंचनामा केला. दरम्यान, पशुधन विकास अधिकारी उज्ज्वल बावनथडे यांनी दोन्ही अस्वलाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा संपूर्ण तपास गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी एस. डी. अवगान करीत आहेत.