गोंदियामध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.  Pudhari Photo
गोंदिया

गोंदिया : निसर्ग कोपला! गोंदियामध्ये 10 दिवसांत 5 जणांचा बळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

1306 घर व गोठ्यांची पडझड; 25 जनावरे वाहून गेली

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवस गोंदियामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे शहरतील नागरिकांचे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मागील दहा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे वीज कोसळून आणि पुरात वाहून गेल्याने 5 जणांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 306 घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. या दरम्यान पुरामुळे नदीकाठावरील गावातील 25 जनावरे वाहून गेल्याने पशुपालक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

19 जुलै रोजीपासून दहा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. यावेळी जिल्ह्यमध्ये झालेल्या नुकसानाचे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांपैकी 4 जणांच्या कुटुंबीयांना प्रशासनातर्फे आर्थिक मदत देण्यात आली आहे. याबरोबरच आतापर्यंत घरांची पडझड झालेल्या 206 नुकसानग्रस्तांना शासनातर्फे त्वरित मदत देण्यात आली आहे. मागील 11 दिवसांत जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस बरसला. यात आतापर्यंत सरासरी 698.7 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी पाहता जुलैपर्यंत सरासरी 594.3 मिमी पाऊस अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत सरासरी 698.7 मिमी पाऊस बरसला असून त्याची 117.6 एवढी टक्केवारी आहे.

पर्हे वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत...

जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली होती. अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पर्हे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम करावा कसा, अशी अडचण निर्माण झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणीसाठी आता धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.

नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता...

पावसामुळे मोठ्याप्रमाणात शेती, घर आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने मंगळवारपासून पंचनामे करण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT