Gondia Mother Killed Her Baby:
गोंदिया जिल्ह्यातील डांगुर्ली परिसरात आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकरी करण्याच्या इच्छेपोटी एका जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या २० दिवसांच्या नवजात बाळाला संपवल्याची कबुली दिली आहे.
घटनेनंतर आरोपी महिलेने बाळ चोरी झाल्याची खोटी तक्रार रावणवाडी पोलिसांत दाखल केली होती. मात्र, पोलिसांना तिच्या तक्रारीत संशयास्पद बाबी आढळल्याने त्यांनी आई आणि वडिलांची सखोल चौकशी सुरू केली.
पोलिसांच्या कसून चौकशीत, बाळाच्या आईने गुन्हा कबूल केला. बाळामुळे आपल्याला घरीच थांबावे लागेल आणि नोकरी करता येणार नाही, या विचारातून तिने बाळाला संपवले. रात्री घरातून बाळाला घेऊन जात तिने वाघ नदीच्या पात्रात फेकल्याची कबुली तिने दिली.
पोलिसांनी वाघ नदीच्या पात्रातून बाळाचा मृतदेह बाहेर काढला असून, आरोपी महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आईनं मुल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली त्यावेळी तिच्या तक्रारीबाबत पोलिसांना संशय वाटत होता. तक्रारदार आई आणि वडील होते. शंका वाटल्यानंतर आम्ही या दोघांची पोलीस चौकशी केली. या चौकशीत बाळाच्या आईनं आपणच बाळाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यांनी राहत्या घराजवळील नदीत ते बाळ फेकून दिल्याची कबुली दिली. आता या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आई अटकेत आहे.