चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरूणाला १५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा  File Photo
गोंदिया

गोंदिया : चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरूणाला १५ वर्षाचा कारावास

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणार्‍या तरूणाला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. ३०) दिलेल्या निकालात १५ वर्ष सश्रम कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. नरेश भैय्यालाल जावळकर (वय ३५ रा. गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मागील ६ वर्षापूर्वी २८ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी १२ ते १ च्या सुमारास पिडीत चिमुरडी आरोपी नरेश जावळकर याच्या घरी फुल तोडण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने घरात कोणीच नसल्याचे पाहून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, सायंकाळी या चिमुरडीने आपल्या आईला घडलेल्या घटनेबाबत सविस्तर सांगितले. यावरून पिडितेच्या आईने २९ ऑगस्ट २०१८ रोजी आरोपीच्या विरोधात गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन विनायक यादव यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूद्ध विशेष न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. या प्रकरणात आरोपीविरूद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी ७ साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.

एकंदरित आरोपीचे वकील व पिडितेतर्फे सरकारी वकील यांचे सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरूद्ध सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपी नरेश जावळकर याला १५ वर्षाचा सश्रम कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पोलीस पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार धीरज तिवारी यांनी काम पाहिले.

दंडाची रक्कम चिमुरडीच्या कुटुंबाला

न्यायालयाने दिलेल्या निकालात सदर दंडाची रक्कम पिडित मुलीला देण्याचे आदेशित करण्यात आले असून सानुग्रह अनुदानाकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही न्यायालयाने पारित केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT