माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. 
गोंदिया

पूर्व विदर्भात भाजपला झटका! माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल घडून आले आहेत. गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आपण काँग्रेस पक्षात घरवापसी करीत असल्याचे रविवारी (दि. ८) पत्रकार परिषदेतून जाहीर केले. अग्रवाल यांच्या काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या निर्णयाने पुर्व विदर्भात विशेषतः गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीचे हात बळकट झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपला मात्र, मोठा धक्का बसला आहे.

गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसकडून २ वेळा विधानपरिषद तर ३ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदी लाटेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांना भाजपने उमेदवारी देखील दिली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते. तर गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अखेर त्यांनी आज (रविवारी) भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती देत १३ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांच्यासह काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड व इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपला दोन महिन्यांत दुसरा धक्का

दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा आता माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला सोडचिट्टी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला दोन महिन्यांत दुसरा मोठा धक्का बसला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT