Korchi Kurkheda road accident Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Accident | कोरची-कुरखेडा रस्त्यावर पाठोपाठ २ मोठे अपघात: ग्रामसेवक जागीच ठार, ८ जण जखमी

बस कुरखेडा येथून कोरचीमार्गे साकोलीकडे जात असताना कोरचीपासून दोन किलोमीटर अंतरावरील मोहगाव वळणावर बस आणि ट्रकचा अपघात

पुढारी वृत्तसेवा

Korchi Kurkheda road accident

गडचिरोली : कोरची-कुरखेडा रस्त्यावर बुधवारी (दि.१०) अवघ्या काही वेळाच्या अंतराने दोन भीषण अपघात घडले. यात ग्रामसेवक जागीच ठार, तर आठ जण जखमी झाले. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास परिवहन महामंडळाची एमएच ४० वाय ५२०७ क्रमांकाची बस कुरखेडा येथून कोरचीमार्गे साकोलीकडे जात असताना कोरचीपासून दोन किलोमीटर अंतरावरील मोहगाव वळणावर बस आणि लोहखनिज घेऊन जाणाऱ्या एमएच ४० बीजी ९०५७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.

या अपघातात बसचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला. बस चालक राहुल जगबंधू यांनी सांगितले की, अचानक बसचे स्टेरिंग जाम झाल्याने अपघात झाला. परिस्थिती ओळखून दुसऱ्या बाजूने उडी घेतल्याने वाहन चालक बचावला. परंतु कमलाबाई मडावी (५६) रा.नकटी, ता.देवरी ह्या गंभीर जखमी, तर लता वट्टी(२३) रा.मसेली व ललीता भक्ता (३०) रा.कोचीनारा ह्या जखमी झाल्या.

अवैध प्रवासी वाहन पलटल्याने ग्रामसेवकाचा मृत्यू

कोरचीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील बेळगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खासगी प्रवासी वाहतूक करणारे एमएच २२ डी १९९० क्रमांकाचे मॅक्स वाहन उलटल्याने दिलीप रामचंद्र धाकडे(४९) हे ठार झाले. ते अलीटोला येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. यासंदर्भात वाहनचालक व्यंकट सिडाम यांनी सांगितले की, स्टेरिंग फ्री झाल्याने ताबा सुटून वाहन उलटले.

या वाहनात १५ प्रवासी होते. त्यातील उज्वला आदेश राऊत(२५) रा.मसेली ही गंभीर जखमी असून तिला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले .मंगली बाई गुरुभिले (४५, रा.जामनारा), वाहनचालक व्यंकट सिडाम हे जखमी झाले. जखमींवर कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.हर्षा उईके यांनी प्रथमोपचार केले. दोन्ही अपघातांची नोंद कोरची पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे तपास करीत आहेत.

विना कागदपत्रांविनाच प्रवासी वाहतूक

अपघातग्रस्त मॅक्स वाहनाच्या चालकाकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. परवाना, इन्शुरन्स काहीच नव्हते, वाहन एक्स्पायर्ड झाले आहे. अशी अनेक वाहने बेदरकारपणे अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. परंतु पोलिस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT