

Teacher killed Gadchiroli
गडचिरोली: मालवाहू ट्रक मागे सरकत असताना स्कूटी स्लीप झाल्याने एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१०) सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास बी-फॅशन प्लाझासमोर घडली. ममता धर्माजी बांबोळे (वय ४२, रा.पोर्ला, ता. गडचिरोली) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या गडचिरोली येथील कार्मेल हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
आयटीआयटी चौकातील गोकुळनगर बायपास मार्गावर ममता बांबोळे वास्तव्य करीत होत्या. आज सकाळी सव्वा आठ वाजता त्या स्कूटीने कार्मेल शाळेत जात होत्या. बी फॅशन प्लाझासमोर पोहचताच समोरुन एक मालवाहू ट्रक मागे येत होता. यामुळे ममता बांबोळे यांनी ब्रेक लावला. त्यामुळे स्कूटी स्लीप होऊन त्या ट्रकच्या चाकात सापडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बाजार चौकापासून धानोरा मार्गावर असलेल्या दुकानांसमोर अनेक जण आपली वाहने ठेवत असतात. शिवाय अनेक दुकानदारही त्यांचे सामान रस्त्यावर ठेवतात आणि मालवाहू वाहने रस्त्यावर उभी असताना दुचाकीस्वारांना मार्गक्रमण करणे कठीण होते. अशाच प्रकारामुळे ममता बांबोळे यांना जीव गमवावा लागला. नवोदय विद्यालयात शिकलेल्या ममता बांबोळे ह्या सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी एकच गर्दी केली. रक्तबंबाळ अवस्थेत ममता स्वत:च उठण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु एकदा डोके वर घेऊनही त्या पुन्हा खाली आपटल्या. परंतु काही युवक त्यांना मदत करण्याऐवजी हे भीषण दृश्य उघड्या डोळ्यांनी बघत मोबाईलमधून शूटींग करत होते. एवढ्यात काही समजदार नागरिक ममताच्या मदतीला धावून गेले. परंतु त्यांचा जीव वाचला नाही.