गडचिरोली

धक्कादायक! गडचिरोलीत अंगणात झोपलेल्या व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटवले

दिनेश चोरगे

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : घरासमोरील अंगणात खाटेवर झोपून असलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.२) अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा या गावात घडली. चरणदास गजानन चांदेकर (४५) असे जळालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहेत.

अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील चरणदास चांदेकर हे छल्लेवाडा ते आलापल्लीपर्यंत खासगी प्रवासी वाहन चालवून उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे ते १ जूनला संध्याकाळी आलापल्ली येथून प्रवासी घेऊन छल्लेवाडा येथे आले. रात्री जेवण आटोपल्यानंतर ते घरासमोरील अंगणात खाटेवर झोपले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवले. त्यानंतर तेथून पळ काढला. काही वेळाने ही बाब त्यांच्या शेजारी दुसऱ्या खाटेवर झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात आली. त्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत चरणदास हे जवळपास ७० ते ८० टक्के भाजले होते. सध्या त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा डीजे वाजविण्यासाठी बामणी येथे गेला होता.त्याला ही माहिती मिळताच त्याने देखील चंद्रपूर गाठले.

चरणदास यांना पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रेपनपल्ली पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ५ लिटरची डबकी आणि लाईटर हस्तगत केले आहे. गावात चांदेकर यांच्याशी कुणाचा वाद होता काय? प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेतून हा प्रकार घडला काय? त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT