जगनलाल सुदाराम मेश्राम (Pudhari Photo)
गडचिरोली

Gadchiroli News | कैमूल येथे सर्पदंशाने तेंदूपत्ता तोडणाऱ्या मूकबधीर मजुराचा मृत्यू

कोरची तालुक्यात जगनलाल मेश्राम तेंदूपाने तोडण्यासाठी खाली वाकताच विषारी सापाने त्याच्या पायाला दंश केला.

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Labourer Dies of Snakebite

गडचिरोली : तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांवर वन्यप्राण्यांचे हल्ले सुरु असतानाच आज (दि.१३) कोरची तालुका स्थळापासून १५ किलोमीटर अंतरावरील कैमूल येथील एका मूकबधीर मजुराला विषारी सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला. जगनलाल सुदाराम मेश्राम (वय ५३) असे मृत मजुराचे नाव आहे.

सध्या कोरची तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिवाची पर्वा न करता लोक जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जात आहेत. मागील आठवड्यात चार ते पाच जणांना रानडुकर आणि अस्वलाने चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. आज सकाळी जगनलाल मेश्राम हा तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेला होता. पाने तोडण्यासाठी वाकताच विषारी सापाने त्याच्या पायाला दंश केला. परंतु मूकबधीर असल्याने तो आरडाओरड करुन कुणाची मदत मागू शकला नाही. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत तो घरी आला. हातवारे करुन त्याने पत्नी, मुलगा आणि तिन्ही मुलींना आपबिती सांगितली. त्याच्या भाषेवरुन विषारी सापाने दंश केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जगनलालला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे ठरविले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

जंगलात राबणाऱ्या मजुरांचे जीवन असुरक्षित

तेंदूपत्ता संकलनासाठी गोरगरीब नागरिक जंगलात जातात. यातून मिळणाऱ्या मजुरीच्या पैशातून ते पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करतात. शिवाय मुलांचे शिक्षण, शेती आणि कर्जाची परतफेडही करतात. परंतु, जंगलात असताना वन्यप्राण्यांचे हल्ले किंवा सर्पदंशाचा सामना त्यांना करावा लागतो. जगनलालही असाच जीवन जगला. तो अत्यंत मेहनती व शांत स्वभावाचा होता. दरवर्षी तेंदूपत्ता तोडण्यासाठी व घरातील आणि शेतातील कामे करण्यासाठी त्याची पत्नी व मुले त्याला सहकार्य करायचे. तो कुटुंबाचा मोठा आधार होता. परंतु त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT