

Gadchiroli civic issues protest
गडचिरोली : संजय गांधी, श्रावणबाळ व इतर निराधारांच्या अर्थसाहाय्य योजनांची रक्कम मासिक ५ हजार रूपये करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कॉ.अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोर शेकडो निराधार नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सचिव भाई रामदास जराते, मारोती गुरुनुले, मनसेच्या विभा बोबाटे, ज्योती सहारे, माकपचे तालुका सचिव कॉ.राजू सातपुते, कॉ.विठ्ठल प्रधान, माणिक कुर्वे, यशवंत नारनवरे, अर्चना मारकवार, माया सिंदी, भगवान राऊत, किसन राऊत, अंजना कुंभलकर, सोनाली आचकुलवार यांच्यासह शेकडो निराधार महिला व वयोवृध्द शेतकरी या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.
ठिय्या आंदोलनाला मार्गदर्शन करताना माकपचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार यांनी सरकार भांडलवदारांचे हजारो कोटींचे कर्ज सरसकट माफ करत आहे. मात्र, जगणे कठीण झालेल्या निराधारांना मदत करायला तिजोरीत पैसे नसल्याचे कारण सांगून टाळाटाळ आहे. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. निराधार योजनांची रक्कम ५ हजार करण्याची चळवळ संपुर्ण राज्यभरात उभी करून ती विधिमंडळाच्या दारापर्यंत नेण्याचे काम आम्ही करू, असा निर्धार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी व्यक्त केला.
संजय गांधी निराधार योजनेच्या विधवा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा, महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ रद्द करण्यात यावा, तालुक्यातील रोजगार हमीच्या मजुरांची मजुरी त्वरीत देण्यात यावी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशावर्कर, शालेय स्वयंपाकी, रोजगार सेवक इत्यादी असंघटीत कामगारांना मासिक २६ हजार रूपये वेतन आणि ५ हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाची अमलबजावणी करण्यात यावी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी इत्यादी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.