Tarakka And Madani Ration Card Distribution
गडचिरोली : राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत महसूल प्रशासनाने आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमल सिडाम आणि मदनी तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण केले.
अहेरी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते आज (ता.८) शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मूळची अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील रहिवासी असलेली तारक्का उर्फ विमल सिडाम ही एकेकाळी नक्षल चळवळीतील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य म्हणून कार्यरत होती. अनेक हिंसक कारवायांमध्ये तिचा प्रमुख सहभाग होता. साडेतीन दशकाहून अधिक काळ नक्षल चळवळीत घालवल्यानंतर तारक्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १ जानेवारी २०२५ रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
तिच्या पाठोपाठ देशातील नक्षल चळवळीचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता व पॉलिट ब्युरो सदस्य असलेला तारक्काचा पती मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यानेही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला होता.
शासनाच्या पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून दोन्ही आत्मसमर्पित नक्षलींना शिधापत्रिका देण्यात आल्या. शिधापत्रिका मिळाल्यामुळे आता त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.