

गडचिरोली : जिल्हा खनिकर्म प्राधिकरणांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या कोट्यवधीच्या निधीवर डल्ला मारण्याच्या हेतूने जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेड व स्वाक्षरीने प्रशासकीय मान्यता दिल्याचे पत्र दिली होते. हा पत्र देणारा चामोर्शी नगर पंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे यास पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
जिल्हा खनिकर्म प्राधिकरणांतर्गत कोट्यवधीची कामे लाटण्याच्या हेतूने चामोर्शी नगर पंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे याने गडचिरोलीतील एका नगरसेवकाला प्रशासकीय मान्यतेचा पीडीएफ आदेश पाठविला होता. खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर तो आदेश बनावट निघाला. पुढे पोलिसांत तक्रार झाल्यानंतर २८ जूनला पोलिसांनी आशिष पिपरे यास छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
आशिष पिपरे हा स्वीकृत नगरसेवक असण्याबरोबरच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा जिल्हाध्यक्षही होता. छत्रपती संभाजीनगरला तैलिक महासभेद्वारे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला असता पोलिसांनी त्यास अटक केली. याविषयीच्या बातम्या माध्यमांनी दिल्यानंतर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्याध्यक्ष, माजी खासदार रामदास तडस यांनी एक पत्र जारी करुन आशिष पिपरे याची जिल्हाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. १ जुलैला तडस यांनी यासंदर्भातील पत्र जारी केले असून, गडचिरोलीचे माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.