धान भरडाईत लाखो रुपयांचा गैरव्यवहार Rice mill scam  (File Photo)
गडचिरोली

Gadchiroli News | लाखो रुपयांचा धान भरडाई घोटाळा; चार राईस मिल मालकांवर गुन्हे दाखल

Rice mill Scam | देऊळगाव येथील चार कोटी रुपयांचा धान खरेदी घोटाळा उघडकीस येत नाही; तोच आता धान भरडाईत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नवे प्रकरण उजेडात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Rice mill scam

गडचिरोली : देऊळगाव येथील चार कोटी रुपयांचा धान खरेदी घोटाळा उघडकीस येत नाही; तोच आता धान भरडाईत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नवे प्रकरण उजेडात आले असून, चार राईस मिल मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०२१-२२ मध्ये आरमोरी येथील जनता राईस मिलला ९ हजार ३१६ क्विंटल धान भरडाईसाठी देण्यात आले होते. या धानापासून मिल मालकाने ६ हजार २४३ क्विंटल तांदूळ तयार करून शासनाला पुरवठा केला. त्यापैकी एका लॉटमधील ४०५ क्विंटल धानापासून २७० क्विंटल तांदूळ तयार केला. मात्र, भरडाई केलेला हा तांदूळ गोदामात जमा न करता प्रत्यक्षात शासकीय काळ्या बाजारातील निकृष्ट दर्जाचा तांदूळ जमा केला.

यामुळे शासनाची ७ लाख ८५ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली, असा ठपका ठेऊन मिल मालक हैदर पंजवानी यांच्याविरुद्ध २ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ३ मे रोजी देसाईगंज येथील अजय राईस मिलचे मालक भास्कर किसन डांगे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. त्यांच्यावरही ७ लाख ८५ हजार ७०० रुपयांच्या धानाचा काळाबाजार केल्याचा ठपका आहे. केंद्रीय पथकाने केलेल्या तपासणीत अजय राईस मिलने ४०५ क्विंटल धानापासून तयार करुन गोदामात जमा केलेला २७० क्विंटल तांदूळ खाण्यास अयोग्य असल्याचे तपासणीत आढळून आले होते.

तिसऱ्या प्रकरणात देसाईगंज येथील सोनल पोहा उद्योग मिलच्या मालक माया प्रभाकर डांगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. राईस मिल बंद असताना आणि विद्युत जोडणी नसताना धान भरडाई केल्याचे दाखवून काळ्या बाजारातील तांदूळ पुरवठा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एकूण १ लाख ८२ हजार ७४३ रुपयांच्या फसवणुकीचा त्यांच्यावर आरोप आहे.

चौथे प्रकरण शारदा स्टिम प्रोडक्ट, कुरूड यांचे आहे. या उद्योगाचे मालक राजकुमार अर्जुनदास मोटवाणी यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यासंदर्भात १५ एप्रिल २०१९ रोजी यशवंत नाकतोडे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली होती. यात शारदा स्टिम प्रोडक्ट ही गिरणी बंद आढळली, तरीही ३ हजार ७५१ क्विंटल धान भरडाई केल्याचे दाखवून फसवणूक केली, असा आरोप आहे. यातून अंदाजे ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे.

या संपूर्ण प्रकरणी तक्रारींची चौकशी करुन फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागातील तहसीलदार तथा खरेदी अधिकारी मनोज डहारे यांच्या फिर्यादीवरुन चारही प्रतिष्ठानांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता काळ्या बाजारास प्रतिबंध व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा अधिनियम १९८० च्या कलम ३, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम १०, भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४२० नुसार हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT