

गडचिरोली : वेगवेगळ्या ठिकाणांहून ७ दुचाकी चोरणाऱ्यास देसाईगंज पोलिसांनी जेरबंद केले आहे. समीर राजरतन चहांदे (वय ३६, रा. रुई, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
६ फेब्रुवारीला मोटारसायकल चोरीसंबंधी देसाईगंज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी या गुन्ह्याचा तपास सुरु असताना समीर चहांदे हा आमगाव येथे मोटारसायकल विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक आगरकर यांना मिळाली. त्यानंतर आगरकर हे आपल्या सहकाऱ्यांसह आमगाव येथे पोहचले. त्यांनी समीर चहांदे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील हिरो कंपनीची एम.३३ वाय ३७२० क्रमांकाची मोटारसायकल जप्त केली. ही मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती समीर चहांदे यांच्यावर देसाईगंज येथे तीन, आरमोरी येथे एक आणि ब्रम्हपुरी येथील पोलिस ठाण्यात दोन असे वाहन चोरीचे सहा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी ३ लाख र५ हजार रुपयांच्या सहा आणि ७५ हजार रुपयांची अन्य एक मोटारसायकल असा एकूण ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी समीर चहांदे यास अटक केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर, पोलिस शिपाई दिनेश सोनकुसरे, सतीश बैलमारे, विलास बालमवार, नीतेश कढव यांनी ही कारवाई केली.