Bhamragarh, Kudkeli Road
गर्भवतीला जेबीसीच्या बकेटमधून नाला ओलांडण्याची धोकादायक वेळ ओढवली. Pudhari News Network
गडचिरोली

Gadchiroli News | रस्ता गेला वाहून; गर्भवतीला जेसीबीच्या बकेटमधून करावा लागला नाला पार

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : अवजड वाहनांची वर्दळ आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आधीच दयनीय अवस्था झालेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची आता मुसळधार पावसामुळे पुरती ‘वाट’ लागली आहे. या रस्त्याच्या वाईट अवस्थेचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह गरोदर मातांनाही सोसावा लागत आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील एका नाल्याचा रपटा वाहून गेल्याने प्रसूतीसाठी जाणाऱ्या एका गरोदर महिलेवर चक्क जेबीसीच्या बकेटमध्ये बसून नाला ओलांडण्याची धोकादायक वेळ ओढवली.

आलापल्ली-भामरागड मार्गावरील पुलांची कामे अर्धवट

आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेले अनेक नाले आणि नद्यांवर मागील अनेक महिन्यांपासून पुलांचे बांधकाम सुरु आहे. परंतु बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. आवागमनाची तात्पुरती व्यवस्था म्हणून पुलाशेजारी रपटे तयार करण्यात आले आहेत. परंतु मागील दोन दिवसांपासून भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस‍ सुरु आहे. त्यामुळे रपटे वाहून गेले आहेत.

जेसीबीच्या बकेटमध्ये झुरी मडावीला बसविले

गुरुवारी (दि. १८) सकाळी भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या २० वर्षीय गरोदर महिलेला पोटात दुखू लागले. आशा वर्कर संगीता शेगमकर यांनी ही माहिती सामुदायिक आरोग्य अधिकारी रिचा श्रीवास्तव यांना दिली. त्यानंतर श्रीवास्तव ह्या ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका घेऊन कुडकेली गावाकडे जाण्यास निघाल्या. परंतु, वाटेत नाल्याला पूर आल्याने आणि रपटा खचल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे आशा वर्कर संगीता शेगमकर गावकऱ्यांच्या मदतीने झुरी मडावी हिला ३ किलोमीटर अंतरावरील नाल्यापर्यंत घेऊन आले. त्यानंतर तेथे कामावर असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये बसून झुरी मडावीला नाला पार करावा लागला.

नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास

यावरुन पावसाळ्याच्या दिवसांत भामरागडसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची विदारक परिस्थिती दिसून येत आहे. निर्ढावलेले प्रशासन यातून धडा घेईल काय, असा सवाल यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

सिरोंचातील ८० विद्यार्थी सुरक्षितरित्या बाहेर

मुसळधार पावसामुळे सिरोंचा येथील शासकीय वसतिगृहात रात्री पाणी शिरले होते. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू आणि पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.

जुलै महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी झुरी मडावीची तीनदा भेट घेऊन तपासणी केली. तिची प्रसूतीची पहिलीच वेळ होती आणि २७ जुलै ही प्रसूतीची संभाव्य तारीख होती. तिच्यासोबत आरोग्य कर्मचारी होते. सध्या झुरीला भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून, तिची प्रकृती उत्तम आहे.
डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी
SCROLL FOR NEXT