राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. Pudhari Photo
गडचिरोली

Gadchiroli News | गडचिरोलीची आरोग्यसेवा होणार विस्‍कळीत : एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु

शासकीय सवेत नियमित समायोजन करण्याची प्रमुख मागणी, १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : शासकीय सेवेत नियमित समायोजन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. गडचिराेली जिल्ह्यातील सुमारे १२०० कंत्राटी कर्मचारी यात सहभागी झाल्याने आरोग्यविषयक कामकाज प्रभावित झाले आहे.

१४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समायोजित करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. परंतू सव्वा वर्ष होऊनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. शिवाय मानधनवाढही देण्यात आलेली नाही. बदली धोरण, इपीएफ, इन्शुरंस इत्यादी मागण्याही मंजूर झालेल्या नाहीत. यासंदर्भात ८ व १० जुलै २०२५ रोजी आरोग्य मंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.

या आंदोलनात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, समुपदेशक, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांतर्गत सर्व अहवाल देणे बंद, लसीकरणासह ऑनलाईन व ऑफलाईन कामेही बंद ठेवण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कोटगले यांनी सांगितले. मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू व अन्य साथीच्या आजारांनी डोके वर काढले असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलन सुरु केल्याने आरोग्य व्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT