

गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाने पुढाकार घेत गडचिरोली आगारातून अतिदुर्गम आंबेझरी गावासाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच बससेवा सुरु केली आहे. यामुळे धानोरा-कोरची तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील १५ गावांतील नागरिकांची तालुका व जिल्हा मुख्यालयी येण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे.
धानोरा-कोरची तालुक्यांच्या सीमावर्ती भागात कटेझरी हे गाव आहे. यंदा २६ एप्रिलला पोलिसांनी पुढाकार घेत गडचिरोली ते कटेझरी बस सुरु केली. मात्र, आंबेझरी हे गाव कटेझरीपासून २१ किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागात आहे. आज पोलिसांच्या पुढाकाराने प्रथमच गावात बस येताच नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत आणि नृत्य करीत बसचे स्वागत केले. शिवाय शालेय विद्यार्थीही हातात तिरंगा घेऊन या आनंदात सहभागी झाले. कटेझरीचे पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी बसचा शुभारंभ केला. गडचिरोलीवरुन निघणारी ही बस चातगाव-धानोरा-येरकड-मुरुमगाव -आंबेझरी-मंगेवाडा-जयसिंगटोला-मालेवाडा या मार्गावरुन धावणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये ये-जा करण्याची सुविधा झाली आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक गोकुळराज, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात राज्य परिवहन महामंडळाने ही बससेवा सुरु केली.
यंदा अतिदुर्गम भागात सुरु झालेली चौथी बस
पोलिसांच्या पुढाकाराने यंदा अतिदुर्गम भागात सुरु झालेली ही चौथी बससेवा आहे. १ जानेवारीला एटापल्ली तालुक्यातील गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी ही बससेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर २६ एप्रिलला गडचिरोली-कटेझरी, तर १६ जुलैला अहेरी-मरकनार ही बसफेरी सुरु करण्यात आली. आज गडचिरोली ते आंबेझरी या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. मागील पाच वर्षांत ४२०.९५ किलोमीटर लांबीच्या २० रस्त्यांबरोबरच एकूण ६० पुलांचे बांधकाम पोलिस संरक्षणात करण्यात आले आहे. शिवाय पोलिस संरक्षणात जिल्ह्यात ५०७ मोबाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली आहे.