.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मागील आठवड्यापासून पडत असलेला पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. या पार्श्वभुमीवर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र निव्वळ पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त असून, त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.
महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. याबरोबरच घरांची पडझड झाली असून, पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. नाल्यावर पूल नसल्याने भामरागड तालुक्यातील एका गरोदर महिलेला जेसीबीच्या साह्याने नाला पार करावा लागला. कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील रपटा वाहून गेल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुरामुळे शाळेत जाणे शक्य होत नाही. सर्पदंश झालेल्या एक इसम रस्ताच नसल्याने दवाखान्यात पोहचू शकला नाही. परिणामी त्याचा जीव गेला. अनेक रस्त्यांची दूरवस्था झाली असून, अहेरी-सिरोंचा बस कित्येक दिवसांपासून बंद आहे. या विदारक परिस्थितीत खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी संसदेचे अधिवेशन सुरु असताना सुटीच्या दिवशी येऊन् पूरग्रस्त् भागाचा दौरा करुन प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. अशावेळी जिल्ह्याचे पालक असलेले देवेंद्र फडणवीस कुठे हरवले आहेत, असा सवाल ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्र्यांच्या मदतीची गरज असताना, ते पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत, अशी टीकाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.