Etapalli Hedri LKAMH Hospital Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Triplets Born | एलकेएएमएच रुग्णालयात उच्च जोखमीची यशस्वी प्रसूती; तिळ्यांचा जन्म

एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील हॉस्पिटलमध्ये (एलकेएएमएच) उच्च जोखमीच्या तिहेरी गर्भधारणेची यशस्वी प्रसूती

पुढारी वृत्तसेवा

Etapalli Hedri LKAMH Hospital

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (एलकेएएमएच) उच्च जोखमीच्या तिहेरी गर्भधारणेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. आपत्कालीन सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे अवघ्या तीन मिनिटांत दोन मुली आणि एका मुलाची सुरक्षित जन्म देण्यात आला. अकाली जन्म झालेल्या तिन्ही नवजात बाळांना विशेष नवजात देखभाल विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

मगेर या आदिवासी बहुल गावातील ३२ वर्षीय महिलेने मार्च २०२६ मध्ये प्रथमच एलकेएएमएच रुग्णालयाला उपचारासाठी भेट दिली होती. अल्ट्रासाऊंड तपासणीत त्यांच्या गर्भात तीन बाळ असल्याचे स्पष्ट झाले. तिहेरी गर्भधारणा ही उच्च जोखमीची असल्याने संपूर्ण गर्भावस्थेत त्यांची नियमित प्रसूतीपूर्व तपासणी आणि विशेष वैद्यकीय देखरेख करण्यात आली.

११ ऑगस्ट रोजी पोटात आणि पाठीच्या खालच्या भागात सौम्य वेदना जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय पथकाने नियमित अल्ट्रासाऊंड, गर्भातील बाळांच्या हृदयगतीचे निरीक्षण आणि आवश्यक त्या इतर तपासण्या करून माता व तिन्ही बाळांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले.

अकाली प्रसूतीची शक्यता लक्षात घेऊन बाळांच्या फुफ्फुसांच्या विकासासाठी आवश्यक औषधे देण्यात आली. तसेच प्रसूतीदरम्यान आपत्कालीन शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते, हे लक्षात घेऊन रक्ताचीही आगाऊ व्यवस्था करण्यात आली.

२१ ऑगस्ट रोजी तपासणीत बाळांच्या रक्ताभिसरणात आणि हृदयगतीत चिंताजनक बदल आढळून आले. त्यामुळे तातडीने सिझेरियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३२ आठवडे आणि ५ दिवसांच्या गर्भधारणेनंतर रात्री ९.२५ ते ९.२७ या अवघ्या तीन मिनिटांत तिन्ही बाळांचा जन्म झाला. त्यांचे वजन अनुक्रमे १ किलो ३६० ग्रॅम, १ किलो १८६ ग्रॅम आणि १ किलो ५३० ग्रॅम आहे.

या प्रसूतीचे व्यवस्थापन दोन स्त्रीरोगतज्ज्ञ, दोन भूलतज्ज्ञ आणि दोन बालरोगतज्ज्ञांच्या पथकाने केले. मातेची प्रकृतीही स्थिर असून तिन्ही बाळांवर नवजात देखभाल विभागात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT