जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले  Pudhari
गडचिरोली

Shivendrasinharaje Bhosale | गडचिरोलीतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुलांची सद्यस्थिती, भारवहन क्षमता तसेच आवश्यक दुरुस्तीची पाहणी करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Bridges Structural Audit

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या सुरक्षिततेबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा. आवश्यक त्या पुलांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी प्राधान्याने करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिले.

जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. यावेळी अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील अनेक भागांचा संपर्क तुटत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे पुलांची सद्यस्थिती, भारवहन क्षमता तसेच आवश्यक दुरुस्तीची पाहणी करण्याचे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. विशेषतः पुराचा धोका असलेल्या पुलांची तपासणी प्राधान्याने करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात नुकसान झालेले किंवा बांधकामादरम्यान कोसळलेले पूल यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. तांत्रिक त्रुटी, निकृष्ट काम अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही भोसले यांनी दिला.

गडचिरोलीतील पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज देण्याची मागणी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केली. याची दखल घेत जिल्ह्यातील आवश्यक लहान-मोठ्या पुलांचा सर्वंकष प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष निधीची मागणी करण्यात येईल, असे भोसले यांनी सांगितले.

नवीन पुलांचे डिझाईन करताना जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस आणि पुराची तीव्रता लक्षात घेऊन आधुनिक तांत्रिक निकषांचा वापर करावा. पूल मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकतील याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

या बैठकीला आ.डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल व खा.डॉ.नामदेव किरसान हे दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT