Gadchiroli Municipal Council BJP Politics Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Politics | गडचिरोली: उपाध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरुन भाजपात असंतोषाची ठिणगी

Gadchiroli News | गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने १५, राष्ट्रवादी काँग्रेस ६, काँग्रेस ५ आणि वंचित बहुजन आघाडीने एक जागा जिंकली

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Municipal Council BJP Politics

गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक निखिल चरडे यांची आज अविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य म्हणून भाजपतर्फे नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचे पती सागर निंबोरकर व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार आणि काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक नंदू कायरकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या निवडीवरुन भाजपमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे.

मागील महिन्यात पार पडलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने १५, राष्ट्रवादी काँग्रेस ६, काँग्रेस ५ आणि वंचित बहुजन आघाडीने एक जागा जिंकली. भाजपच्या प्रणोती निंबोरकर थेट जनतेतून निवडून येत नगराध्यक्ष झाल्या. आज नगर परिषद सभागृहात उपाध्यक्षाची निवड आणि स्वीकृत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सभा पार पडली. यात उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे निखिल चरडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून भाजपतर्फे सागर निंबोरकर व ज्येाष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीनंतर नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, माजी आमदार डॉ.देवराव होळी तसेच भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी उपाध्यक्ष निखिल चरडे तसेच स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन केले.

भाजपमध्ये नाराजीचा सूर

उपाध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका योगिता पिपरे, नगरसेवक अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे या अनुभवी नगरसेवकांना संधी द्यावी, असे भाजपमधील बहुतेकांना वाटत होते. परंतु अनिल कुनघाडकर यांची आधीच गटनेते म्हणून निवड करून त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे योगिता पिपरे यांना उपाध्यक्षपद मिळेल, अशी चर्चा होती. परंतु पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या निखिल चरडे यांना उपाध्यक्ष बनविल्याने भाजपमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या. नाराजीचा प्रत्यय नगर परिषद परिसरात आला. सभा संपण्यापूर्वीच नगरसेविका योगिता पिपरे सभागृहाबाहेर पडल्या, त्यांच्या पाठोपाठ काही वेळाने मुक्तेश्वर काटवे हेदेखील निघून गेले. नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते उपस्थित नव्हते. केवळ माजी आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महासचिच गोविंद सारडा आदींनी अभिनंदनाचे सोपस्कार पार पाडले

आ.बंटी भांगडिया, गोविंद सारडा यांना हटवा: रमेश भुरसे

नुकतीच झालेली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आणि स्वीकृत सदस्यांची निवड करताना आपणास डावलण्यात आले. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांना जिल्ह्याचे प्रभारीपद दिल्यापासून येथे गटबाजी सुरु झाली आहे. त्यामुळे भांगडिया यांच्याकडील प्रभारीपद काढून टाकावे आणि जिल्हा महासचिव गोविंद सारडा यांची तत्काळ पदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

रमेश भुरसे यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मी प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारी मागितली होती. परंतु मला तिकिट देण्यात आले नाही. तेव्हा तुम्हाला स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात येईल, असा पक्षनेत्यांनी शब्द दिला. परंतु जेव्हा स्वीकृत सदस्य घेण्याची वेळ आली तेव्हा मला केवळ अर्धा तासापूर्वी सांगण्यात आले आणि दुसऱ्या क्रमांकाचा अर्ज असल्याने माझा अर्ज आपसूकच बाद झाला. हे जिल्हा महासचिव गोविंद सारडा यांच्यामुळे झाले. गोविंद सारडा यांच्यामुळे प्रभाग क्रमांक १ आणि ५ मधील ३ उमेदवार पराभूत झाले. प्रभाग क्रमांक ६ मध्ये राहणारे जिल्हा निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे यांच्याही वॉर्डात पक्षाचा एक उमेदवार पराजित झाला. दुसरे असे की, २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे २१ नगरसेवक निवडून आले होते, यंदा ही संख्या १५ वर थांबली. तरीही हे दोघे विजयाचे शिल्पकार म्हणून कसे मिरवतात, असा सवाल रमेश भुरसे यांनी केला.

चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांना जिल्ह्याचे प्रभारी केल्यापासून भाजपमध्ये दोन ते तीन गट पडले आहेत. भांगडिया हे गॉडफादर असल्याने आपले कोणी काहीच बिघडवू शकत नाही, अशी काही जणांची भावना झाली आहे. गटनेता निवडताना कोणालाच विश्वासात घेतले नाही. बैठक व चर्चा न करता ही निवड करण्यात आली. त्यामुळे आ.भांगडिया यांचे प्रभारीपद काढून गोविंद सारडा यांची जिल्हा महामंत्रीपदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणीही रमेश भुरसे यांनी केली.

पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते गजानन येनगंधलवार यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. मी ४० वर्षांपासून भाजपात आहे. अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्याने माझ्यावर १९ केसेस लावण्यात आल्या. परंतु स्वीकृत सदस्यपद देताना माझ्या नावाचा विचार केला नाही. हे असेच सुरु राहिले तर आपण पक्षत्याग करु, असा इशारा येनगंधलवार यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT