

गडचिरोली : चारित्र्याच्या संशयावरुन दगडावर डोके आपटून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना ६ जानेवारीला धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम रुपीनगट्टा गावात घडली. या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
कनिष्ठा राकेश कुजूर (३२) व राकेश सुकना कुजूर (३७) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. छत्तीसगड सीमेवर असलेल्या रुपीनगट्टा गावाचा समावेश पेंढरी पोलिस मदत केंद्रांतर्गत होतो. ५ जानेवारीला राकेशच्या शेतातील धानाच्या मळणीचे काम आटोपले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पती-पत्नी शेतावर गेले. राकेशचे वडील व त्याची मुलगीही शेतावर होते. दुपारी राकेश व कनिष्ठा यांनी घराकडे जात असल्याचे सांगितले, मात्र, संध्याकाळी वडील व मुलगी घरी परतले असता दोघेही दिसले नाही.
माहिती दिल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. ७ तारखेला दुपारी गावापासून काही अंतरावरील गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. एका मोठ्या दगडावर रक्त सांडलेले दिसल्याने दगडावर डोके ठेचून कनिष्ठाची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. मात्र, राकेश आढळून न आल्याने हत्येनंतर तो पसार झाल्याचे समजून गावकऱ्यांनी त्याचाही शोध घेतला.
दरम्यान दुसऱ्या दिवशी ८ जानेवारीला राकेशच्या शेतातच त्याचा मृतदेह आढळून आला. पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःही विष प्राशन करून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती प्राप्त होतात पेंढरीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्या्ंसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. राकेश हा बरेचदा दारुच्या नशेत पत्नी कनिष्ठा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करीत असे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्या गावात बैठक घेऊन राकेशला समज देण्यात आली होती. परंतु संशयाचे भूत कायम होते. त्यातूनच ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पेंढरीचे प्रभारी पोलिस अधिकारी गोपीचंद लोखंडे घटनेचा तपास करीत आहेत.
चार मुले झाली पोरकी
राकेश व कनिष्ठा यांना मानवी (१२), मेहमा (९) व शालिनी (५) या तीन मुली आणि अर्णव(७) हा एक मुलगा आहे. यातील तीन मुले देऊळगावच्या आश्रमशाळेत शिकत आहेत. परंतु आई आणि वडिलांचा मृत्यू झाल्याने चारही मुले पोरकी झाली आहेत. आता त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी ८० वर्षीय आजोबांवर येऊन ठेपली आहे.