Bhamragad Bear Attack Flood Rescue  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Bear Attack | अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमीचा स्ट्रेचरवर झोपून पुरातून प्रवास; १८ किमीची पायपीट

अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरातील नागरिकांच्या वेदना अजूनही संपता संपेनाशा झाल्या

पुढारी वृत्तसेवा

Bhamragad Bear Attack Flood Rescue

गडचिरोली : अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरातील नागरिकांच्या वेदना अजूनही संपता संपेनाशा झाल्या आहेत. बिनागुंडा येथील एका व्यक्तीला अस्वलाने जखमी केल्यानंतर त्यास स्ट्रेचरवर झोपवून पूर आलेल्या ओढ्यांतून मार्गक्रमण करीत दवाखान्यात पोहचवावे लागल्याची घटना उजेडात आली आहे.

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेववर वसलेल्या बिनागुंडा या डोंगर-दऱ्या आणि घनदाट जंगलव्याप्त गावातील रहिवासी पोरिया गोगा तिम्मा (३५) हे मंगळवारी २८ जुलैला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दामनमर्का गावाकडे जात होते. वाटेत अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पोरिया हे गंभीर जखमी झाले. दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

माहिती मिळताच बिनागुंडा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेविका अश्विनी सहारे यांनी तातडीने त्यांच्यावर प्रथमोपचार केले. मात्र, मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव अशा परिस्थतीत जखमीला पुढील उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात हलविणे शक्य झाले नाही. त्यामुळे रात्रभर बिनागुंडा उपकेंद्रातच त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

बुधवारी २९ जुलैला गावकऱ्यांनी पोरियाच्या अंगावर प्लॉस्टिक झाकून स्टेचरवर झोपवून लाहेरीच्या दिशेने पायीच आगेकूच सुरु केली. रस्त्यातील चिखल आणि नाल्यांतील कंबरभर पाण्यातून वाट काढत गावकऱ्यांनी पोरिया यास पुढे नेले. गुंडेनूर नाल्याजवळ येईपर्यंत त्यांना तब्बल पाच तास लागले.

घटनेची माहिती मिळताच लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी तेथील रुग्णवाहिका गुंडेनूर नदीपर्यंत पोहोचवली. याच रुग्णवाहिकेतून जखमी पोरिया तिम्मा यांना लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून तेथे उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

आरोग्य सेविकेची मोठी मदत

जखमी रुग्णाला जीवनदान देण्यात बिनागुंडा येथील आरोग्यसेविका अश्विनी सहारे यांनी मोलाची भूमिका बजावली. सहारे यांनी जखमीसोबत तब्बल १८ किलोमीटर पायपीट केली. त्यांना आरोग्यसेवक सुधाकर रामटेके, आशासेविका मासे दुर्वा तसेच गावकऱ्यांनीही रात्रभर साथ दिली. या कार्याबद्दल आरोग्यसेविका अश्विनी सहारे यांचे कौतूक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT