Gadchiroli Heavy Rain | गडचिरोलीत मुसळधार: १० प्रमुख मार्ग बंद, भामरागडमध्ये ४९ जणांची पुरातून सुटका

भामरागड शहरात पुरात अडकलेल्या ४५ जणांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले
Gadchiroli Bhamragad Flood Rescue
Gadchiroli Bhamragad Flood RescuePudhari
Published on
Updated on

Gadchiroli Bhamragad Flood Rescue

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून गुरूवारी (दि.३०) पहाटेपर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्याने १० प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातील सखल भागातील वस्त्या जलमय झाल्या होत्या, तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या ४९ जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुखरुप बाहेर काढले.

बुधवारच्या रात्रीपासून आज पहाटेपर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस पडला. यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून, तब्बल १० मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पामुलगौतम नदी आणि परिसरातील नाल्यांना अचानक पूर आला. या पुरात अडकून पडलेल्या एकाच कुटुंबातील केये कुडयामी (१६) आणि अक्षरा केये कुडयामी (३) या तिघांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रात्री सुखरूप बाहेर काढले.

Gadchiroli Bhamragad Flood Rescue
Gadchiroli Naxal | फुलणार परिसरात नक्षल पत्रके टाकणाऱ्या सहा जणांना अटक

तसेच आज सकाळी भामरागड शहरात पुरात अडकलेल्या ४५ जणांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गडचिरोलीत आज सकाळी १० वाजतापासून पावसाने उघाड दिला.

कोणत्या धरणातून किती विसर्ग?

सकाळी साडेनऊ वाजतापर्यंत भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून १ लाख ३५ हजार ५९२ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह धरणातून ९१ हजार क्यूसेक, तर सिरोंचा तालुक्यालगतच्या तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा प्रकल्पातून ८१ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. गोसेखुर्द व चिचडोह धरणातील विसर्ग वाढविण्यात येणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Gadchiroli Bhamragad Flood Rescue
Gadchiroli Naxal Pamphlets | पिपली बुर्गी भागात नक्षल पत्रके टाकणाऱ्या दोघांना अटक

मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

मागील चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक १६३.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात १६३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भामरागड तालुक्यातील भामरागड मंडळात तब्बल २४१.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडल्याने तेथे पूरस्थिती निर्माण झाली. तेथील इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पुरामुळे बंद असलेले मार्ग

पुरामुळे गडचिरोली-धानोरा, आलापल्ली-भामरागड, कुरखेडा-वैरागड, कोरची-बोटेकसा, धानोरा-रांगी, कोरची-बेतकाठी, कुरखेडा-तळेगाव, रोमपल्ली-झिंगानूर, एटापल्ली-गट्टा व मुलचेरा-आलापल्ली या दहा मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news