गडचिरोली,: येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र नगर पालिका निवडणूक नियम १९६६ च्या नियम १७(१)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने न्यायालयात दाखल अपिलांच्या निर्णयांच्या अनुषंगाने गडचिरोली नगर परिषदेतील तीन आणि आरमोरी नगर परिषदेतील एक, अशा एकूण चार प्रभागांमधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
गडचिरोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १(अ), ४(ब) आणि प्रभाग क्रमांक ११ (ब) चा त्यात समावेश आहे. शिवाय आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १०(अ) मधील निवडणुकीला जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी स्थगिती दिली आहे. या चारही प्रभागांमधील निवडणूक सुधारित कार्यक्रमांनुसार घेण्यात येतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ च्या पत्रान्वये नगर परिषद सदस्य व अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील काही जागांसाठी अपिल दाखल करण्यात आले होते. मात्र, संबंधित जिल्हा न्यायालयांकडून अपिलांचा निकाल २२ नोव्हेंबर २०२५ नंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सदस्य पदाच्या निवडणुका ४ नोव्हेंबर २०२५ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत, तसेच अशा प्रकरणात अध्यक्षपदाचा समावेश असल्यास संबंधित संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १(अ), ४(ब) आणि प्रभाग क्रमांक ११ (ब) तसेच आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १०(अ) मधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे.