

चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मूल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजूरा, नागभीड या नगर परिषदांच्या व भिसी नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. तर गडचांदूर, मूल, बल्लारपूर, वरोरा न.प. च्या काही सदस्य निवडणुकीला सुध्दा स्थगिती देऊन सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
परंतु ज्या नगरपरिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहे. अशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.
त्या अनुषंगाने घुग्गुस नगर परिषदेचे अध्यक्षपद व सात सदस्य जागा तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 - ब (सर्वसाधारण महिला), मूल न.प.ची जागा क्र. 10 - ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 17 (1)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने घुगुस नगर परिषदेचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम स्थगिती होणार. तर गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 - ब (सर्वसाधारण महिला), मूल न.प.ची जागा क्र. 10 - ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या जागेकरीता सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमाला सुध्दा स्थगिती देण्यात आली आहे.
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार घुग्घुस नगर परिषदेचा तर गडचांदूर, मूल, बल्लारपूर आणि वरोरा येथील वरील नमुद सदस्य निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.