गडचिरोली

Gadchiroli Accident : धावत्या एसटी बसचे मागील चाक निखळले; सुदैवाने मोठा अनर्थ टळला, विद्यार्थ्यांसह प्रवासी भयभीत

चालकाचे प्रसंगावधान, एसटीच्या बस देखभाल व तांत्रिक तपासणी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

रणजित गायकवाड

गडचिरोली : आलापल्ली–सिरोंचा मार्गावर टेकमपल्ली गावाजवळ अहेरी आगाराच्या बसचे मागील चाक अचानक निखळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. बसमध्ये शाळकरी विद्यार्थी आणि लहान मुलांसह अनेक प्रवासी प्रवास करत होते. चाक निखळल्याने प्रवाशांमध्ये तीव्र घबराट पसरली; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी आगाराची 'एमएच ०७ सी-९४०५' क्रमांकाची दामरंचा–अहेरी बस सकाळी सुमारे सात वाजता दामरंचा येथून प्रवाशांना घेऊन अहेरीकडे निघाली होती. टेकमपल्ली गावाजवळ पोहोचताच अचानक गाडीचे मागील चाक निखळून बाहेर आले. त्यामुळे बस एका बाजूला झुकली आणि प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. शाळेत जाणाऱ्या मुलांसह प्रवाशांचा जीव काही काळ अक्षरशः टांगणीला लागला होता.

या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बस देखभाल व तांत्रिक तपासणी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बस आगारातून मार्गावर रवाना करण्यापूर्वी तिची काटेकोर तपासणी केली जाते का? चाकाची जोडणी आणि नट-बोल्ट्स योग्य स्थितीत होते का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

अहेरी आगाराच्या बसेस रस्त्यात अचानक बंद पडणे, खिडक्या-छत निखळणे किंवा तांत्रिक बिघाड होऊन प्रवासी वाऱ्यावर सुटण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. या पार्श्वभूमीवर आज घडलेल्या घटनेचे नेमके तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही. प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी आणि आगारातील सर्व बसेसची सखोल तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT