गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनी आज (दि.२५) शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरुवातीला अभिनव लॉन येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सभेनंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. महायुतीने अद्याप गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, महायुती आपल्यालाच तिकिट देईल, असा विश्वास डॉ.देवराव होळी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीकरिता आज गडचिरोली आणि आरमोरी या विधानसभा क्षेत्रांमधून प्रत्येकी एक असे एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात रामदास मसराम, तर गडचिरोली मतदारसंघातून डॉ.देवराव होळी यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. अहेरी मतदारसंघात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आज आरमोरी मतदारसंघात ११ व्यक्तींनी ३२, गडचिरोलीत ४ व्यक्तींनी ८, तर अहेरी मतदारसंघात ६ व्यक्तींनी ९ नामनिर्देशनपत्रांची उचल केली. आतापर्यंत जिल्ह्यात १८६ नामनिर्देशनपत्रांची उचल करण्यात आली आहे.