Gadchiroli Tribal Students Oral Cancer Diagnosed
गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील तब्बल ३०९ विद्यार्थ्यांना पूर्व मुख कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी विधान परिषदेत दिल्याने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी १५ जुलैला विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी व्यसनाधीन झाल्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी लेखी उत्तर दिले. सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, भामरागड आणि अहेरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या ३०९ विद्यार्थ्यांना पूर्व मुख कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती डॉ. अशोक उईके यांनी दिली.
डॉ. अशोक उईके यांनी सांगितलं की, गडचिरोली प्रकल्पात ७६९ विद्यार्थ्यांपैकी ३०४ विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ७ विद्यार्थ्यांवर नागपूर येथे लेझर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. भामरागड तालुक्यातील १,७७८ विद्यार्थ्यांपैकी ४८७ विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन असल्याचं, मात्र त्यांना कोणतेही गंभीर आजार नसल्याचं निष्पन्न झाल्याचंही डॉ.उईके यांनी उत्तरात म्हटलं आहे. अहेरी प्रकल्पातील २,१६३ विद्यार्थ्यांपैकी १८९ विद्यार्थी व्यसनाधीन असून त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना पूर्व कर्करोगाचे लेझर उपचार करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहितीही आदिवासी विकास मंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली. एकूणच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थी व्यसनाधीन होत असल्यानं चिंता वाढल्याचं दिसून येत आहे.