

गडचिरोली : जिल्ह्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून, नद्या व नाल्यांना पूर आल्याने १९ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गोगावनजीकच्या पाल नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आरमोरीमार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
मागील चोवीस तासांत देसाईगंज तालुक्यात १६८ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल कोरची तालुक्यात १४५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान गोसेखुर्द धरणातून सध्या ८ हजार क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, तो टप्प्याटप्प्याने १२ हजार ५०० क्यूमेक्सपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
शिवाय गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे २ दरवाजे ३ फूट उंचीवरुन सुरु करण्यात आले आहेत.
गोगावनजीकच्या पाल नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने गडचिरोली-आरमोरी हा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. तसेच देसाईगंज-अर्जुनी, कुरखेडा-मालेवाडा, कोरची-भिमपूर, कुरखेडा-वैरागड, वैरागड-कोरेगाव रांगी, मांगदा-कलकुली, कढोली-उराडी, चातगाव-पिसेवडधा, गोठणगाव-चांदागड, कुरखेडा-चारभट्टी, आंधळी-नैनपूर, शंकरपूर-कोरेगाव चोप, आष्टा-तुळशी, मालेवाडा-खोब्रामेंढा, वैरागड-देलनवाडी, चौडमपल्ली-चपराळा, सावरगाव-गॅरापत्ती-कोटगूल व अरसोडा-कोंढाळा या १९ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.