Anti-Naxal Operations Maharashtra
गडचिरोली : विविध हिंसक घटनांमध्ये सहभागी राहिलेल्या ११ नक्षल्यांनी बुधवारी (दि.१०) पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले. या सर्वांवर एकूण ८२ लाख रुपयांचे बक्षीस होते.आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये २ विभागीय समिती सदस्य, ३ पीपीसीएम, २ एसीएम आणि ४ दलम सदस्यांचा समावेश आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये भामरागड दलमचा विभागीय समिती सदस्य रमेश उर्फ भिमा बाजू गुड्डी लेकामी, छत्तीसगडमधील पश्चिम बस्तर विभागीय समिती सदस्य भिमा उर्फ सितू उर्फ किरण हिडमा कोवासी, पीएलजीए बटालियन क्रमांक एकचा पीपीसीएम पोरिये उर्फ लक्की अडमा गोटा, कंपनी क्रमांक ७ चा पीपीसीएम रतन उर्फ सन्ना मासू ओयाम,
कंपनी क्रमांक ७ ची पीपीसीएम कमला उर्फ रागो इरिया वेलादी, एमएमसी झोनच्या कान्हा भोरमदेव दलमचा एसीएम पोरिये उर्फ कुमारी भिमा वेलादी, कुतुल एरिया कमिटीचा एसीएम रामजी उर्फ मुरा लच्छू पुंगाटी, कंपनी एकमधील प्लाटून क्रमांक २ चा सदस्य सोनू पोडियाम ऊर्फ अजय सानू कातो, प्लाटून क्रमांक ३२ चा सदस्य प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी, प्लाटून क्रमांक ३२ ची सदस्य सीता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो आणि आंध्र-ओरिसा बॉर्डर दलम सदस्य साईनाथ शंकर मडे यांचा समावेश आहे. यातील काही सदस्यांनी गणवेशात शस्त्रांसह आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर एकूण ८२ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे २०१५ पासून आतापर्यंत एकूण ११२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. शासनाने २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि पोलिस दलाने केलेल्या पुनर्वसनामुळे आजपर्यंत एकूण ७८३ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे.
विशेषतः याच वर्षी केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याच्यासह वरिष्ठ कॅडरच्या ६१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
याप्रसंगी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते भूपतीच्या आत्मसमर्पणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विशेष अभियान पथकातील (सी-६०) अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट उडान- वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका' या पुस्तकाचे अनावरण श्रीमती शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी आपल्या भाषणात सी-६० पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच, त्यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रास्त्रे खाली ठेवून शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि इतर अधिकारी उपस्थित होते.