गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : शेती लगतच्या जंगलात गुरे चारत असताना एका इसमास वाघाने ठार केल्याची घटना आज (दि. २८ जुलै) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पिपरटोला या गावात घडली. खुशाल निकुरे(वय ६०) असे मृत इसमाचे नाव असून तो धुंडेशिवणी येथील रहिवासी आहे.
खुशाल निकुरे हा आज (दि.२८) दुपारी आपल्या शेतावर गेला होता. तेथील काम आटोपल्यानंतर लगतच्या जंगलात गुरे चारत असताना झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक निकुरे याच्यावर हल्ला करुन त्याला ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. शेतीचा हंगाम सुरु असताना वन्यजीव-मानव संघर्ष सातत्याने होत असल्याने शेतीची कामे कशी करायची, या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.