Vijay Wadettiwar on Ladki Bahin Yojana
चंद्रपूर : अदानी उद्योगसमूहाच्या झपाट्याने झालेल्या वाढीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट कृपा असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला दुजोरा देत वडेट्टीवार यांनी आज (दि.१२) चंद्रपुरात माध्यमांशी बोलताना भाजपवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून भाजपवर महिलांना प्रलोभन देण्याचा आरोपही केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानींच्या भरभराटीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मोदींची आरती करूनच अदानी मोठे झाले. भाजपने अदानींना पाठीशी घातले आहे. मोदी म्हणजे अदानी आणि अदानी म्हणजे मोदी, असे समीकरण असल्यानेच अदानींची ही अफाट भरभराट झाली,” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
आज चंद्रपुरात माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपकडून काँग्रेसवर ‘लाडकी बहीण’ योजनेला विरोध केल्याचा आरोप केला जात असताना, वडेट्टीवार यांनी तो आरोप फेटाळून लावला. “आम्ही लाडक्या बहिणीला कधीही विरोध केला नाही. एखाद्या उमेदवाराची भूमिका म्हणजे संपूर्ण काँग्रेसची भूमिका होते काय? भाजपवाले पागल झालेत का?” असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “योजनेचे पैसे निवडणुकीच्या तोंडावर देण्यास आमची हरकत आहे. हे पैसे आधीच का दिले नाहीत? किंवा निवडणूक झाल्यानंतर का देत नाहीत? निवडणुकीच्या तोंडावर पैसे देऊन महिलांना प्रलोभन देण्याचा आणि त्या माध्यमातून मते मिळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. म्हणूनच आम्ही या पद्धतीला विरोध करत आहोत,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करून उद्योगपती आणि निवडणुकीच्या राजकारणाला प्राधान्य देत असल्याचा आरोप करत, सामान्य जनता आणि महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली. चंद्रपुरातील त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटण्याची शक्यता आहे.