

Vijay Wadettiwar Political Criticism
चंद्रपूर : महाराष्ट्रात गुंड, पैसा, एजन्सी आणि पोलिस बळाचा वापर करून सत्ता टिकवण्याची नवीन संस्कृती भाजपने सुरू केली आहे. भाजपने राज्याला गुन्हेगारांचा आणि गुंडांचा अड्डा बनवला आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात गुंडशाही, पैशाचा माज आणि भ्रष्टाचाराचे राजकारण सुरू करणाऱ्या भाजपवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपुरात घणाघाती प्रहार राजकीय वातावरण तापले आहे.
"प्रचंड पैसा, केंद्रीय एजन्सींचा वापर, पोलिस बळ आणि यानेही विजय मिळत नसेल तर गुंडांचा आधार घ्यायचा, ही भाजपची नवीन संस्कृती महाराष्ट्रात रुजवली जात आहे. राज्यात गुन्हेगारी वाढवून भाजपने महाराष्ट्राला गुन्हेगारांचा अड्डा बनवले आहे," असे वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी त्यांनी मुंबईवरही भाजपची "बुरी नजर" असल्याचा आरोप केला. "भाजपला केवळ मुंबई लुटायची आहे. शिवरायांनी सुरत लुटली, पण आता बाहेरून येऊन भाजपला मुंबई तोडायची आणि लुटायची आहे. मुंबईला या दृष्टीपासून वाचवण्यासाठी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो," असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री चंद्रपुरात प्रचारासाठी येऊन "सुधीर कमळ बघ, किशोर कमळ बघ" असे सांगून गेले, मात्र आता "सुधीर किशोर बघ आणि किशोर सुधीर बघ" असे म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी लगावला. "त्यामुळे आता नांदा सौख्यभरे, एवढेच म्हणावे लागेल," असे म्हणत त्यांनी चिमटा काढला.
चंद्रपूर महापालिकेतील भाजपच्या कारभारावरही त्यांनी कठोर भाषेत प्रहार केला. "ज्यांनी शेण खाल्ले, त्यांना लोक शेणच मारणार. चंद्रपूर महापालिकेत भाजपने भ्रष्टाचाराचे शेण खाल्ले. त्यामुळे लोकांनी शेण फेकून मारण्याची पाळी यांच्यावर आणली. आज फक्त शेण लावले आहे, पुढे काय काय फेकून मारतात ते बघाच," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. चंद्रपूर भाजपचे हकालपट्टी केलेले शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या फ्लेक्सवरील फोटोला शेण फासण्यात आल्याच्या घटनेवरून त्यांनी भाजपवर तिखट शब्दात निशाणा साधला.