

Vijay Wadettiwar vs CR Patil
नागपूर : उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रात शिवनेरीवर नव्हे, तर गुजरातच्या सुरतला झाला, असेही ते बोलतील. ढोकळा, फापडा खात होते अशीही बडबड करतील, असा टोला काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (दि.६) माध्यमांशी बोलताना केला. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. या केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी केलेल्या विधानाचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला.
लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, या विधानाचा समाचार घेताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अंगात सत्ता भिनली असल्याने ते रोज बेताल बोलत आहेत. माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते विलासराव देशमुख एक सुसंस्कृत नेता होते. त्यांनी कधी सुडाचे राजकारण केले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला डाग लागू दिला नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला. त्यांचे विचार संपवतील, अशी कुणाची औकात नाही, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
हे संधीसाधू राजकारणी आहेत. सत्तेसाठी ते उद्या सरसंघचालक मोहन भागवत, गोळवलकर गुरुजी यांना देखील विस्मृतीत टाकतील. भाजपचा इतिहास असाच आहे, असेही ते म्हणाले. मनपा निवडणूक जाहीर झाली. उमेदवारी प्रक्रियेनंतर मतदार यादी आली. अद्याप महापौर आरक्षण जाहीर झालेली नाही. निवडणूक आयोग भाजपचा नोकर झाला असून महापौर आपल्या सोयीने आणायचे असल्यामुळे हे सोयीचे राजकारण सुरू आहे.
मतांचे ध्रुवीकरण हाच भाजपचा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थानिक निवडणुकीत स्थानिक मुद्दे त्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. निवडणुकीचे मुद्दे भरकटवले जात आहेत. सत्तेसाठी पैसा, पैशासाठी सत्ता हे समीकरण त्यांचे आहे. विकासाचे स्वप्न दाखविणे व नवनवीन जुमला करणे हे त्यांचे राजकारण असल्याचा आरोप केला.