Temperature  Pudhari
चंद्रपूर

Vidarbha Heatwave | विदर्भ तापतोय! अकोला 44°C वर; उष्णतेची लाट येण्याचा इशारा

अमरावती, वर्धा, नागपूरसह सर्व जिल्ह्यांत तापमानाची उसळी; 16 ते 19 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट संभव

पुढारी वृत्तसेवा

Akola Temperature 44 Degrees

चंद्रपूर : विदर्भात उष्णतेची तीव्रता झपाट्याने वाढत असून 14 एप्रिल रोजी अकोला येथे सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून हवामान खात्याने 16 ते 19 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा दिला आहे.

विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत विदर्भाने तापमानवाढीत आघाडी घेतली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 44 अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे.

मंगळवारी (दि. 14) अकोला येथे सर्वाधिक 44.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यापाठोपाठ अमरावती येथे 43.8 अंश, वर्धा येथे 43.5 अंश तापमानाची नोंद झाली. यवतमाळ आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांत 42.6 अंश तापमान होते.

तसेच वाशीममध्ये 42.4 अंश, चंद्रपूर आणि नागपूर येथे प्रत्येकी 42.2 अंश तापमानाची नोंद झाली. ब्रम्हपुरी येथे 42.0 अंश, बुलढाणा येथे 41.6 अंश आणि गोंदिया येथे 41.1 अंश तापमान नोंदवण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत असून उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हवामान विभागाने 16 ते 19 एप्रिल या कालावधीत विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तज्ञांच्या मते, या कालावधीत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून विशेषतः दुपारी बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि हलके, सैल कपडे परिधान करावेत, असा सल्ला दिला जात आहे.

विदर्भातील वाढते तापमान पाहता येत्या काही दिवसांत उष्णतेचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे असून प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT