Sindewahi Chimur Tiger Attack Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यांनी चंद्रपूर हादरले; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा बळी, गुराखी गंभीर जखमी

चिमूरच्या गरडापार, सिंदेवाहीतील धूमनखेडा येथे दोघांचा मृत्यू; पोंभुर्ण्यात गुराख्यावर वाघाचा हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Sindewahi Chimur Tiger Attack

चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले असून, शुक्रवारी (दि. ३०) वाघांच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका गुराख्यावर झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. चिमूर तालुक्यातील गरडापार आणि सिंदेवाही तालुक्यातील धूमनखेडा येथे दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केले, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात गुराख्यावर वाघाने हल्ला केला. एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिमूर तालुक्यातील गरडापार येथे शेतकऱ्याचा मृत्यू

चिमूर तालुक्यातील गरडापार येथील सदाशिव चिरकुटा खडसंग (वय ५०) हे आज शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास पत्नीसमवेत स्वतःच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान, शौचासाठी जात असल्याचे सांगून ते शेतातून दूर गेले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने पत्नीने शोधाशोध केली; मात्र त्यांचा शोध लागला नाही. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

गरडापारच्या पोलीस पाटलांनी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकरी आणि वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबविली असता कक्ष क्रमांक ३८० मधील उरकूडपार जंगल परिसरात सदाशिव खडसंग यांचा मृतदेह आढळून आला. दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठविला. वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी निशा राठोड, वनपाल रामदास नैताम यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले. संबंधित वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावून त्याला जेरबंद करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी दिली.

सिंदेवाही तालुक्यातील धूमनखेड्यात शेतकऱ्याला वाघाने फरफटत नेले

दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगावलगतच्या धूमनखेडा येथे दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. येथील पत्रू रामा मेश्राम (६२) हे गावालगत असलेल्या स्वतःच्या शेतात गेले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला असता एका ठिकाणी त्यांची चप्पल, चष्मा आणि रक्ताचे डाग आढळून आले.

यामुळे वाघाच्या हल्ल्याचा संशय बळावल्याने सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शोधमोहीम सुरू करण्यात आली. घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील देऊळगाव तलावाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने हल्ला करून त्यांना फरफटत नेल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट झाले. या घटनेत मृतकाचा मुंडका धडापासून वेगळा झाल्याचेही आढळून आले. मेश्राम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

गावाला लागूनच असलेल्या शेतात वाघाने दबा धरून बसून शेतकऱ्यावर हल्ला केल्याने परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा तुकूम येथे गुराखी गंभीर जखमी

तिसरी घटना पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात घडली. राजेश्वर बिजा सिडाम (वय ६०) हे नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. यावेळी वनकक्ष क्रमांक ४३६ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी राजेश्वर सिडाम यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शेतात कापूस वेचणे, शेतीची कामे करणे तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलालगत जाणे शेतकरी आणि गुराख्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू आणि एका गुराख्याला गंभीर दुखापत झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी वनविभागाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व शेतमजूर वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT